Sunday, 16 July 2017





* त्रिकोणा किल्ला -पावसाळी ट्रेक *

         शनिवार , दि .१५ जुलै २०१७ रोजी त्रिकोणा किल्ला , ता.मुळशी येथे पावसाळी ट्रेक मित्रांसोबत केला . तब्बल  २० वर्षांनी मी या गडावर पाऊल ठेवले . मला त्यावेळच्या मित्रांबरोबर या किल्यावर केलेल्या ट्रेकची आठवण पुन्हा एकदा झाली. असो !
          आम्ही सायंकाळी ४ .२५ वाजता तिकोणापेठ गावातून किल्ला चढायला सुरवात केली . सोबत पुण्यातील आपटे प्रशालेतील माझे सहकारी शिक्षक श्री . मोहन कटके , श्री . संतोष वाटाडे , अमोल हरभरे व गणेश पंडित हे होते . हिरवाईने सह्याद्रीच्या रांगा नटलेल्या आहेत. जणू काही पृथ्वीने हिरवा शालूच परीधान केला आहे . निसर्गाचे हे सुंदर रूप डोळयात कायम साठवून ठेवावसं वाटतं . सर्वांनी खूपच छान पावसाळी ट्रेकचा अनुभव घेतला . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किल्ला सर केल्यानंतर वेगळाच आनंद झाला . सर्वानी ' जय भवानी जय शिवाजी ', ' हर हर महादेव ' अशा घोषणा दिल्या . या आमच्या उत्साहात सोबतीचे ट्रेकर्सही सहभागी झाले . या किल्यावर कुटुंबासोबत एक ४ वर्षाचा व दुसरा ५ वर्षाची मुलेही ट्रेक करताना दिसत होती . या मुलांकडे पाहुन आम्हा सर्वांना ती जणू प्रेरित करित होती असे वाटू लागले .
     ३५ मिनिटांतच गडावर पोहोचलो . उंचावर जणू आम्हाला ढगच स्पर्श करत आहेत असे वाटू लागले . आजूबाजूला काहीच दिसत नव्हते . फक्त पांढरे -शुभ्र ढगच हळूवार अंगाला स्पर्श करत होते .ढगाची व  धुक्याची लाट कमी झाल्यावर पश्चिमेला तुंगी किल्ला, पायथ्याशी पवना धरण, ऊत्तरेस लोहगड व विकासागड किल्ले हलकेसे दिसू लागले .निसर्गाचे सौंदर्य खूपच छान वाटत होते . क्षणभर असे वाटले की आज गडावरच मुक्काम करावा . पण ते शक्य नव्हते . जस जसशी सायंकाळ होऊ लागली , अंधार पडू लागला तस तसा पावसाचा व वाऱ्याचा वेग वाढू लागला . सुरक्षारक्षकाने सर्व गिरीप्रेमींना गडावरून खाली उतरण्यासाठी सूचना दिल्या . मग प्रत्येकाची पावलं गडावरून खाली उतरण्याकडे धावू लागली .पायथ्याशी ६ वाजता पोहोचलो . दोघात एक असे एका स्वीट कॉर्नचे दोन भाग करून प्रत्येकाने स्वीट कॉर्नवर ताव मारला अन् आमची गाडी पुण्याच्या दिशेने निघाली ...

शब्दांकन : - भगवान पांडेकर
दि .१५ /०७ /२०१७

2 comments:

SJ said...

Apratim varnan. Tumhi lekh liha

Bhagwan Pandekar said...

होय